डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सरकारविरोधी घोषणाबाजी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
एल्गार मराठी न्यूज
धुळे | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतरमंतर येथे शैक्षणिक प्रश्न, नीट (NEET) पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले लोकशाहीवादी कार्यकर्ते, शिक्षण अभ्यासक, पर्यावरणप्रेमी व संशोधक सोनम वांगचुक यांच्यावरील कथित पोलिस कारवाईचा धुळ्यात तीव्र निषेध करण्यात आला. सत्यशोधक विद्यार्थी संघटना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, डाव्या पक्षांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रथम धुळे शहरातील बसस्थानकाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पुतळ्यासमोर एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. "सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध असो", "पेपरफुटी बंद करा", "विद्यार्थ्यांना न्याय द्या", "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर सर्व कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून या कारवाईचा निषेध नोंदविला.
निवेदनानुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या विद्यार्थी-युवकांच्या कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेने नीट पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, नवीन शैक्षणिक धोरण आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारताचे प्रख्यात वैज्ञानिक, शिक्षण अभ्यासक, पर्यावरणप्रेमी आणि लोकशाहीवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक सहभागी झाले असून ते गेल्या १८ दिवसांपासून आमरण उपोषण करत होते, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू असताना शासनाने दबावतंत्राचा वापर केला. पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आंदोलनात सहभागी विद्यार्थी व युवकांवर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यांना पांगविण्यात आल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे. शांततापूर्ण आंदोलनावर पोलिस बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांवर आघात करणारे असून, सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, देशात वारंवार घडणाऱ्या नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि गैरव्यवहारांमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. वर्षभर मेहनत घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य काही क्षणांत उद्ध्वस्त होत आहे. या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांवर तीव्र मानसिक ताण निर्माण झाला असून, देशभरात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनांकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित एवढ्या गंभीर प्रश्नांवर सरकार प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
निवेदनात नवीन शैक्षणिक धोरणावरही टीका करण्यात आली. या धोरणामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर जात असल्याचा दावा करण्यात आला असून, शाळा संकुल, स्वायत्त महाविद्यालये आणि खासगी विद्यापीठांच्या वाढत्या प्रभावामुळे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची भूमिका मांडण्यात आली. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि इतर मूलभूत प्रश्नांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीकाही करण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रातील वाढती अनागोंदी, पेपरफुटीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यात आलेले अपयश आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्नांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे, सरकारला प्रश्न विचारणे आणि आपल्या मागण्या मांडणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही थांबवून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
यावेळी सिद्धांत बागुल, हर्ष मोरे, केतन निकम, नीलिमा भामरे, मयुरी जाधव, श्वेता गवळे, निकिता गवळे, दीक्षा वेंदे, साधना वाघ, प्रसिका जगदेव, राज वाघ, दिनेश बैसाने, धनंजय जगताप, सिद्धार्थ बैसाने, राज पगारे, विश्वजीत वाघ, हरीश वाघ, मनोज नगराळे, राकेश अहिरे, जितेंद्र अहिरे, संदीप बोरसे, महेंद्र शिंदे, दीपक बैसाने, अतुल बैसाने, मनीष दामोदर, भूषण ब्राह्मणे, मधुकर थोरात, अमोल शिरसाठ, विजय वाघ, सचिन बागुल, शरद वेंदे, जेतवन मोरे, धम्मदीप सावंत, अजय मोरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या