SIR 100% पूर्ण म्हणे! मग मृतांची नावे अजूनही मतदार यादीत कशी?

 


गाजावाजा, बॅनर-पोस्टर्स अन् शुभेच्छांचा वर्षाव; प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

एल्गार मराठी न्यूज 

धुळे : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेचे काम मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देत पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रक्रियेच्या प्रचारासाठी बॅनर, पोस्टर्स तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. काही राजकीय पक्षांकडून तर SIR चे काम 100 टक्के पूर्ण झाल्याचे सांगत शुभेच्छांचे संदेशही प्रसारित करण्यात आले.


SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रारूप मतदार याद्या तयार करून जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या प्रारूप यादीत आपले नाव आहे की नाही, याची तपासणी करावी, असे आवाहन करणारे व्हिडिओ आणि अधिकृत माहितीही समोर येत आहे.


मात्र, याच प्रारूप मतदार याद्यांमध्ये मृत व्यक्तींची नावे अद्याप कायम असल्याचे निदर्शनास येत असल्याने SIR प्रक्रियेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


जर विशेष सखोल पुनर्निरीक्षणामध्ये मतदार यादीतील प्रत्येक नोंदीची काटेकोरपणे पडताळणी करण्यात आली असेल, तर मृत मतदारांच्या नावांची पडताळणी आणि त्यानंतर त्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया नेमकी कितपत प्रभावीपणे झाली, असा सवाल आता उपस्थित होत आहे.


‘100 टक्के पूर्ण’च्या दाव्यांवर खोचक सवाल


SIR चे काम पूर्ण झाल्याचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करण्यात आला. शुभेच्छांचे संदेशही प्रसारित झाले. मात्र, प्रारूप मतदार यादी समोर आल्यानंतर पुन्हा नागरिकांनाच आपली नावे तपासण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत “SIR 100 टक्के पूर्ण झाले असेल, तर मृत व्यक्तींची नावे अजूनही मतदार यादीत कशी?” हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होत आहे.


यामुळे केवळ SIR प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच नव्हे, तर ‘100 टक्के काम पूर्ण’ असल्याचा गाजावाजा करणाऱ्या राजकीय पक्षांच्या दाव्यांवरही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.


पडताळणी नेमकी कुठे झाली?


मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीविरहित करण्यासाठी विशेष सखोल पुनर्निरीक्षणाची प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेचा उद्देशच मतदार यादीतील त्रुटी दूर करणे हा असल्याने मृत व्यक्तींची नावे कायम राहिल्याचे आढळल्यास त्यामागील कारण स्पष्ट करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे.


मृत मतदारांची माहिती संबंधित विभागापर्यंत पोहोचली होती का? पडताळणीदरम्यान ती तपासण्यात आली का? नावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती का? आणि जर SIR प्रत्यक्षात 100 टक्के पूर्ण झाले असे सांगितले जात असेल, तर “मृत व्यक्तींचे SIR कोणी केले?” हा प्रश्नही आता चर्चेत येणे स्वाभाविक आहे.





प्रारूप मतदार यादीवर नागरिकांकडून हरकती व दावे मागविण्याच्या प्रक्रियेत ही बाब स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने मृत व्यक्तींची नावे कायम राहण्यामागील कारण स्पष्ट करून मतदार यादीतील नोंदींची पुन्हा काटेकोर पडताळणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


एकीकडे ‘SIR 100 टक्के पूर्ण’चा गाजावाजा आणि दुसरीकडे प्रारूप मतदार यादीतील कायम असलेली मृतांची नावे—या विरोधाभासाचे उत्तर आता संबंधित यंत्रणा आणि SIR पूर्ण झाल्याचे सांगणाऱ्यांनी देण्याची वेळ आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या