ऐतिहासिक संदेश भूमीवर बुद्ध वंदना, परित्राणपाठ आणि २२ प्रतिज्ञांचे सामूहिक वाचन; संदेश भूमी संरक्षण व संवर्धन कृती समितीच्या वतीने आयोजन
एल्गार महाराष्ट्र न्यूज
धुळे : ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळे येथील ऐतिहासिक संदेश भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बुद्ध वंदना, परित्राणपाठ आणि २२ प्रतिज्ञांचे सामूहिक वाचन करण्यात आले.
भारतीय समाजव्यवस्थेत समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक धम्मक्रांतीला ७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी धम्मविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे झालेल्या परिषदेत धर्मांतराची घोषणा केली होती. त्यानंतर विविध धर्मांचा सखोल अभ्यास करून त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. समाजातील अज्ञान, विषमता आणि जातिभेद दूर करून विवेकनिष्ठ जीवन जगता यावे, या उद्देशाने त्यांनी अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या.


0 टिप्पण्या