एल्गार मराठी न्यूज
धुळे : सरकारी शाळांमधील विद्यार्थीसंख्या, शिक्षकांची रिक्त पदे, शाळांमधील मूलभूत सुविधांचा अभाव तसेच शिक्षणाच्या खासगीकरणासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी धुळ्यात ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत चंदन नगर बुद्ध विहार, चंदन नगर, देवपूर, धुळे येथे ही कार्यशाळा होणार आहे.
आयोजकांच्या मते, मागील काही वर्षांत कमी पटसंख्येच्या नावाखाली सरकारी शाळांचे समायोजन व बंद करण्याची प्रक्रिया वाढली आहे. शाळा दूरवर समायोजित झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच सरकारी शाळांमधील सुविधांचा अभाव, शिक्षकांची रिक्त पदे आणि अशैक्षणिक कामांचा परिणाम शिक्षणव्यवस्थेवर होत असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
शाळा बंदीची कारणे केवळ शैक्षणिक नसून त्यामागे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घटक असल्याची भूमिका कार्यशाळेच्या आयोजकांनी मांडली आहे. सरकारी शाळांबाबत समाजात निर्माण झालेली नकारात्मक धारणा बदलणे, संविधान व शिक्षण हक्क कायद्याच्या आधारे जनप्रबोधन करणे आणि शाळा वाचविण्यासाठी व्यापक लोकचळवळ उभी करणे, या विषयांवर कार्यशाळेत चर्चा होणार आहे.
शाळा बंदीच्या प्रश्नावर राष्ट्रीय व राज्य पातळीवर व्यापक चर्चा होणे गरजेचे असल्याचेही आयोजकांनी नमूद केले आहे. शाळा वाचवा, शिक्षण वाचवा आंदोलन अधिक सघन आणि मूलग्राही करण्यासाठी कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यशाळेसाठी दत्ता थोरात, सिद्धांत बागुल, देवानंद थोरात, प्रवीण पानपाटील, हर्ष मोरे, केतन निकम, निलिमा भामरे, मयुरी जाधव, श्वेता गवळे, निकिता गवळे, दीक्षा वेंदे, साधना वाघ, प्रसिका जगदेव, राज वाघ, तन्मय ठोसर, दिनेश बैसाणे, धनंजय जगताप, सिद्धार्थ बैसाणे, राज पगारे, विश्वजीत वाघ, हरिश वाघ, शरद वेंदे, मनीष दामोदर, भूषण ब्राह्मणे, मधुकर थोरात आणि अमोल शिरसाट यांनी आवाहन केले आहे.


0 टिप्पण्या