एमआयएमनंतर आता १३ सदस्यांच्या राष्ट्रवादी-शिवसेना शहर विकास आघाडीनेही विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगितला
एल्गार मराठी न्यूज
धुळे । धुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून राजकीय घडामोडींना वेग आला असून, एमआयएमनंतर आता राष्ट्रवादी-शिवसेना शहर विकास आघाडीनेही या पदावर आपला दावा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विरोधी पक्षनेतेपदाबाबत चार आठवड्यांत मेरिटनुसार निर्णय घेण्याचे आदेश दिल्यानंतर या पदासाठी राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
राष्ट्रवादी-शिवसेना शहर विकास आघाडीचे नगरसेवक धीरज कलंत्री यांनी आघाडीच विरोधी पक्षनेतेपदासाठी मेरिटमध्ये असल्याचा दावा केला आहे. महापालिकेतील विद्यमान संख्याबळाचा दाखला देताना भाजपचे ५०, राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीचे १३ आणि एमआयएमचे १० सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कलंत्री यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादी-शिवसेना शहर विकास आघाडी म्हणून १३ नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गटनोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे एमआयएमच्या १० सदस्यांच्या तुलनेत आघाडीचे संख्याबळ अधिक असल्याचा दावा त्यांनी केला.
विरोधी पक्षनेतेपद हे केवळ राजकीय पद नसून महापालिकेतील लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्याला महत्त्व असल्याचे कलंत्री यांनी नमूद केले. सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांमध्ये अन्याय, त्रुटी किंवा चुका झाल्यास जनतेच्या वतीने त्यांना जाब विचारण्याची भूमिका विरोधी पक्षनेत्याची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीने महापालिका निवडणूक एकत्र लढवून १३ सदस्यांचा एकसंध गट स्थापन केला आहे. त्यामुळे संख्याबळ आणि अधिकृत गटनोंदणीच्या आधारे विरोधी पक्षनेतेपदावर आघाडीचाच हक्क असल्याचा दावा कलंत्री यांनी केला.
महापौरांनी नैतिकतेच्या आधारे विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा निर्णय यापूर्वीच जाहीर करायला हवा होता, असेही कलंत्री यांनी म्हटले. आता न्यायालयाच्या आदेशानुसार मेरिटच्या आधारे लवकरच योग्य निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी आणि एमआयएम या दोन्हींकडून करण्यात आलेल्या दाव्यांमुळे धुळे महापालिकेतील आगामी राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या