भंते नागसेन सातपुडा पर्वत यांच्या नेतृत्वाखाली ऊन, वारा, पाऊस झेलत जळगाव ते धुळे ऐतिहासिक पदयात्रा यशस्वी
एल्गार मराठी न्यूज
धुळे प्रतिनिधी
२१ जुलै रोजी जळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेली आणि ३१ जुलै रोजी धुळे येथील ऐतिहासिक लांडोर बंगल्यावर सांगता झालेली ‘भीमस्मृती धम्म पदयात्रा’ सामाजिक समता, धम्म आणि संविधान जागृतीचा प्रभावी संदेश देणारी ठरली. भंते नागसेन सातपुडा पर्वत यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० किलोमीटरचा प्रवास ऊन, वारा आणि मुसळधार पावसाचा सामना करत पूर्ण करण्यात आला.
चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांतील दुर्गम जंगल परिसरात ध्यानसाधना करणारे भंते नागसेन यांनी वैभवापेक्षा साधेपणा, धम्म आणि समाजप्रबोधनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत पूज्य गुरूजी ज्ञानज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भंते प्रियबोधी, भंते सूर्यज्योती, भंते आनंद, भंते आर्यनाग, भंते क्रांतीज्योती, भंते सारीपुत्त, भंते संघरक्षित, भंते नागज्योती, भंते धम्मज्योती, भंते धम्मरत्न यांच्यासह अनेक भिक्खू, उपासक-उपासिका आणि धम्मप्रेमींनी सहभाग घेतला.
पदयात्रेदरम्यान एरंडोल, धरणगाव, अमळनेर, मंगरूळ, फागणे आणि धुळेसह विविध ठिकाणी पदयात्रींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गावोगावी बुद्धवंदना, त्रिशरण-पंचशील, धम्मदेशना, संविधान जागृती तसेच समता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.
३० जुलै रोजी पदयात्रा धुळे शहरात दाखल झाली. नगरसेविका वंदनाताई भामरे यांनी भागाई शैक्षणिक संकुलात भिक्खू संघाच्या मुक्कामाची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसातही पदयात्रींनी अंतिम टप्पा पूर्ण करत सायंकाळी लांडोर बंगला येथे प्रवेश केला.
लांडोर बंगला येथे धम्मवंदना करून ३१ जुलै १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक मुक्कामाच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी भगवान बुद्धांचा करुणा, प्रज्ञा, समता आणि मैत्रीचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला.
भंते नागसेन यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली ही पदयात्रा केवळ २०० किलोमीटरचा प्रवास नसून धम्म, संविधान, समता आणि बंधुतेची मूल्ये जनमानसात रुजविण्याचा प्रभावी सामाजिक उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


0 टिप्पण्या