धुळ्यात गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसासह आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 


वलवाडी परिसरात कारवाई; पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

एल्गार मराठी न्यूज 

धुळे, दि. 31 ऑगस्ट : धुळे शहरात विनापरवाना गावठी कट्टा (पिस्टल) आणि जिवंत काडतूस बाळगल्याच्या आरोपावरून स्थानिक गुन्हे शाखेने एका 36 वर्षीय व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे 41 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती धुळे पोलीस प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अवैध शस्त्रांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

दि. 30 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वलवाडी येथील जय संतोषी माता कॉलनी परिसरातील नदीकिनारी पुलाजवळील रस्त्यावर सापळा रचण्यात आला.

या कारवाईदरम्यान मंजूर शाह डबू शाह (वय 36, रा. गवळी वाडा, जामा मशिदीमागे, मोगलाई, धुळे) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून विनापरवाना एक देशी गावठी कट्टा (पिस्टल) मॅगझीनसह आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 41 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 249/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, संबंधित आरोपीने हे शस्त्र सुमारे एक ते दीड वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील उमट येथून खरेदी केल्याची माहिती चौकशीदरम्यान दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तथा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे, सपोनि दीपक ढोके तसेच पोलीस अंमलदार आरीफ पठाण, राहुल सानप, शिरीष भदाणे, प्रकाश सोनार, संदीप पाटील, देवेंद्र ठाकूर आणि आशिषकुमार वानखेडे यांच्या पथकाने केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या