साक्रीतील बँक ऑफ बडोदा परिसरातील घटना; कांदा विक्रीचे ५ लाख ८० हजार रुपये जमा करण्यासाठी आले होते शेतकरी
एल्गार मराठी न्यूज
चिकसे, ता. १९ : कांदा विक्रीतून मिळालेले पैसे बँकेत जमा करण्यासाठी आलेल्या ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या प्लास्टिक पिशवीला धारदार वस्तूने कापून अज्ञात चोरट्याने तब्बल ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना साक्री शहरातील बँक ऑफ बडोदा परिसरात घडली. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री येथील अंबापूर रोडवरील रामजी नगर परिसरात राहणारे सुभाष पाटील (वय ७०) हे आपल्या शेतातील कांदा विक्रीतून मिळालेले ५ लाख ८० हजार रुपये बँक ऑफ बडोदा शाखेत जमा करण्यासाठी आले होते. दि. १८ रोजी सायंकाळच्या सुमारास ते बँकेत पैसे जमा करण्याची प्रक्रिया करीत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील प्लास्टिकच्या पिशवीला धारदार वस्तूने कापले.
पिशवी कापल्यानंतर त्यातील तब्बल ५० हजार रुपयांची रोकड चोरट्याने लांबवली. पिशवीतील रक्कम कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुभाष पाटील यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. बँकेसारख्या गजबजलेल्या ठिकाणी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साक्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बँकेतील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयित चोरट्यांचा शोध घ्यावा आणि वृद्ध शेतकऱ्याची चोरी गेलेली ५० हजार रुपयांची रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास साक्री पोलीस करीत आहेत.


0 टिप्पण्या